औरंगाबाद: मनपा प्रशासनाने कचरा संकलनाचे खाजगीकरण करीत बेंगलोर येथील पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीला कंत्राट दिले आहे. या कंपनीने ४ फेब्रुवारी पासून शहरात कचरा संकलनाला सुरवात केली असून, आज घडीला ६ प्रभागात या कंपनीच्या वतीने कचरा संकलन करण्यात येत आहे. असे असतानाही या कामापोटी कंपनीला देण्यात येणारे दोन महिन्यांचे सुमारे दिड कोटी रुपये थकले असल्याचा प्रकार समोर आला आहे.
शहरात गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात मोठ्या प्रमाणावर कचरा कोंडीची समस्या निर्माण झाली. यावर शासनाने दिलेल्या निधीतून मनपाने शहरातील विविध ठिकाणी कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्प उभारण्याचे ठरवले. त्यात मनपाने कचरा प्रक्रिया केंद्रापर्यंत कचरा नेण्यासाठी खासगी कंपनी पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीला कचरा संकलनाचे कंत्राट दिले. या कंपनीने ४ फेब्रुवारी पासून शहरात कचरा संकलन करण्यास सुरुवात केली. प्रारंभी २ ,७ व ९ या तीन प्रभागात व त्यानंतर प्रभाग क्रमांक ३ नुकतेच प्रभाग क्रमांक १ व ८ मध्ये संबंधित कंपनीचे कचरा संकलन सुरू केले आहे. आज घडीला कंपनी शहरातून २५० टन कचरा संकलित करीत असून, मनपाने संबंधित कंपनीसोबत केलेल्या करारा नुसार प्रतिटन १८६३ रुपये प्रमाणे मनपा प्रशासनाने कंपनीला पैसे द्यायचे आहेत. गेल्या दोन महिन्याचा विचार केल्यास पहिल्या महिन्याचे ६९ लाख व दुसऱ्या महिन्याचे ८७ लाख असे एकूण १ कोटी ५६ लाख रुपये दोन महिन्याचे थकलेले आहेत. ही रक्कम अशीच वाढत गेल्यास मनपा प्रशासनाला संबंधित कंपनीचे देयक देने कठीण होईल. एकतर मनपाची आर्थिक स्थिती खराब आहे. ठेकेदार,महावितरणसह अन्य काहीचे मनपाला कोटी रुपयांचे थकीत देने आहे. परिस्थिती अशीच राहिली तर कचरा संकलन करणाऱ्या कंपनीची थकीत रक्कम अशीच वाढत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.